श्रीनगर - लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात आज मतदान होत आहे. देशातील 91 लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह नागरिकांकडून दिसून येत आहे. मात्र, काश्मीरच्या पुँछ येथील ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ईव्हीएमवरील काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटणंच दाबल जात नसल्याचं सांगण्यात येत आहे.
काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत ट्विट करुन आपली नाराजी दर्शवली आहे. अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यामधील व्यक्तीकडून ईव्हीएमच्या घोळाबाबत सांगण्यात येत आहे. तसेच ईव्हीएमचे एक बटन दाबले जात नसल्याचे या व्यक्तीकडून सांगितले जात आहे. हाताचे बटण काम करण्यात येत नाही, असेही ही व्यक्ती मान्य करत आहे. याबाबत मतदारांनीही नाराजी दर्शवली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये 100 ईव्हीएम खराब झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदान ठप्प झालं असून यापूर्वी देखील अनेक वेळा ईव्हीएम खराब होऊन मतदानावर परिणाम झाल्याच्या घटना झाल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, महाराष्टातील विदर्भातही अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.देशात पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या आठ जागा, बिहारच्या चार जागा तर आसाम आणि महाराष्ट्रातील सात जागा, ओडिशातील चार जागा आणि पश्चिम बंगालच्या दोन जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकूण 91 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे.