श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बसवर दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यात आठ जवान शहीद तर २१ जखमी झाले. सुरक्षा दलावरील गेल्या काही वर्षांतील हा सर्वात घातक हल्ला असून त्याचे स्वरुप पहाता तो लष्कर ए तोयबाने घडवून आणलेला आत्मघाती हल्ला असल्याचे दिसते. यावेळी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले.दहशतवाद्यांच्या मृतदेहांवरून प्रथमदृष्ट्या ते पाकिस्तानी असल्याचे दिसते. ते लष्कर ए तोयबाचे सदस्य तसेच फिदायीन असण्याची शक्यता आहे, असे सीआरपीएफचे महानिरीक्षक नलीन प्रभात यांनी सांगितले.गोळीबाराच्या सरावानंतर जवानांची बस श्रीनगरला परतत होती. तेव्हा दोघांनी बसला लक्ष्य केले. ते एका कारमधून उतरले आणि त्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यांचा बसमध्ये प्रवेशाचा इरादा होता. मात्र, तत्पूर्वीच सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीने (आरओपी) त्यांना ठार केले, असे प्रभात यांनी सांगितले. २१ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चार जणांची प्रकृति गंभीर असल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात आणखी दोन दहशतवादी सहभागी होते, असे सांगितले जाते. तथापि, अधिकृत सूत्रांकडून याला दुजोरा मिळू शकला नाही. (वृत्तसंस्था)सुरक्षा दलांना लक्ष्य करून केलेला गेल्या तीन आठवड्यांतील हा तिसरा व २४ जून २०१३ नंतरचा सर्वात घातक दहशतवादी हल्ला आहे. २०१३ मध्ये श्रीनगरजवळील हैैदरपुरा येथे लष्करी दलांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले होते.
काश्मीरमध्ये आठ जवान शहीद
By admin | Published: June 26, 2016 4:58 AM