सुरेश भटेवरा, नवी दिल्लीगृहमंत्री राजनाथसिंह यांच्या २५ आॅगस्टच्या काश्मीर दौऱ्यानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन. वोहरा यांना बदलण्याची तयारी चालवल्याची माहिती सूत्रांनी दिली. काश्मीरमधे अजूनही तणावाची स्थिती आहे. ८ जुलैपासून व्यापार, व्यवसाय, कार्यालये, दुकाने, शाळा सारेकाही ठप्प आहे. रविवारी राज्यात कर्फ्युचा ५१वा दिवस होता. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सलग ५१ दिवस संचारबंदी लागू असल्याचे बहुधा हे पहिलेच उदाहरण असावे. वोहरा यांच्या जागेवर राज्यपाल पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते निवृत्त मेजर जनरल भुवनचंद्र खंडुरी, माजी गृहसचिव अनिल बैजल, निवृत्त लेफ्टनंट जनरल सैयद अता हसेनन व निवृत्त जनरल वेदप्रकाश मलिक, मिझोरमचे माजी राज्यपाल अमोलक रतन कोहली व दिल्लीचे माजी उपराज्यपाल विजय कपूर अशी ६ नावे नावे चर्चेत आहेत. कोण आहेत वोहरा?राज्यपाल एन.एन. वोहरा माजी नोकरशहा आहेत. १९९७ ते १९९८ या काळात ते पंतप्रधानांचे मुख्य सचिव होते. २00७ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी राज्यपाल जगमोहन व विद्यमान राज्यपाल वोहरा यांच्या कारकिर्दीच्या अगोदर सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडेच जम्मू काश्मीरचे राज्यपालपद सोपवले जात असे. १९८९ साली काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचा प्रारंभ झाला. त्यानंतर २00८ साली एन.एन. वोहरांच्या हाती राज्यपालपदाची सूत्रे सोपवण्यात आली. २0१३ साली दुसऱ्या कार्यकालासाठी केंद्र सरकारने त्यांची पुनर्नियुक्ती केली. बुऱ्हाण वाणीच्या वडिलांनी रविशंकर यांच्याशी केली चर्चा १ सुरक्षा दलाशी चकमकीत मारला गेलेला हिज्बुलचा अतिरेकी बुऱ्हाण वाणी याचे वडील मुजफ्फर वाणी यांनी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्याशी बंगळुरूस्थित आश्रमात चर्चा केली. मुजफ्फर वाणी यांनी फोनवरून वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गत आठवड्यात आपण बंगळुरूत खासगी कामानिमित्त गेलो होतो. या वेळी श्री श्री रविशंकर यांच्याशी चर्चा केली. श्री श्री रविशंकर हे शांतिपुरुष आहेत. त्यांना आपण काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली. वाणी असेही म्हणाले की, आपण श्री श्री रविशंकर यांना या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आपल्या प्रभावाचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे. २ श्री श्री रविशंकर यांनी मला विचारले की, काश्मीरच्या जनतेला काय हवे आहे? त्यावर आपण त्यांना काश्मिरात येऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आवाहन केले, असेही वाणी म्हणाले. शिक्षक असलेल्या वाणी यांनी सांगितले की, काश्मीरप्रश्नी दीर्घकालीन तोडगा काढण्यास फुटीरवाद्यांसोबत विनाअट चर्चा व्हायला हवी. हुर्रियत हे काश्मीरचे नेतृत्व आहे आणि त्यांच्याशी विनाअट चर्चा व्हायला हवी.
काश्मीरचे राज्यपाल बदलणार?
By admin | Published: August 29, 2016 2:42 AM