नवी दिली : जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या भागांमध्ये देशातील सर्वाधिक पर्यटक खेचून आणण्याची क्षमता आहे. काश्मीरमध्ये एक काळ असा होता, तिथे बॉलिवूडच्या सिनेमांचे शूटिंग होत होते. मात्र, मागच्या काळात हे क्वचितच घडले असेल. यामुळे काश्मीरचे पर्यटनही घसरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द करण्याबाबतचे फायदे सांगितले. देशाची सर्वोच्च संसद कायदे बनवत होती. मात्र, कल्पना करू शकत नाही की हे कायदे देशाच्या एका भागाला लागूच होत नव्हते. याचप्रमाणे आधीच्या आणि आपल्या सरकारने राबविलेल्या योजनाही जम्मू काश्मीरला लागू होत नव्हती. येथील नागरिक यामुळेच विकासापासून वंचित राहत होते. शिक्षणातील आरक्षण, नोकऱ्या, विविध योजना या नागरिकांना मिळत नव्हत्या. यामुळे हे कलम रद्द झाल्याने या जनतेचा फायदाच होणार आहे.
यावेळी मोदी यांनी लडाखमध्ये अडव्हेंचर टुरिझमला मोठा वाव असल्याचे सांगितले. कलम 370 मुळे या भागचे मोठे नुकसान झाले. काश्मीर हे बॉलिवूडच्या सिनेमा निर्मात्यांसाठी आवडीचे ठिकाण होते. मात्र, तेथे नंतर कमी सिनेमे बनले. मी विश्वास देतो की, काश्मीरमध्ये पुढील काळात आंतरराष्ट्रीय सिनेमांचेही चित्रिकरण होईल, असे मोदी यांनी सांगितले.
ईदचा सण जवळच आहे. त्यामुळे सरकार जम्मू काश्मीरमध्ये काळजी घेत आहे की, ईदच्या काळात तेथील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये. तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांचे मी आभार मानत आहे. तेथील परिस्थिती सांभाळणे कठीण असतानाही तेथील प्रशासन ज्या प्रकारे प्रयत्न करत आहे, ती प्रशंसनीय असल्याचे मोदी यांनी सांगितले.
यावेळी मोदींनी जम्मू काश्मीरच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. त्यांनी राजकीय घराण्यांमुळे तरुणाई पुढे येऊ शकली नाही. पण आता हेच तरुण विकासाच्या प्रवाहात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.