अयोध्येत 500 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर, प्रभू श्रीरामांचे भव्य-दिव्य मंदिर तयार होत आहे. 22 जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जवळपास आठ हजार लोक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी प्रभू रामचंद्र यांचे मंदिर सजवले जात आहे. मंदिरासाठी देश-परदेशातून मोठ्या प्रमाणावर गिफ्ट्स येत आहेत. यातच कश्मीरातील काही मंडळींनी रामलला यांच्या सेवेसाठी कश्मीरचे खास ऑर्गेनिक केसर गिफ्ट केले आहे. तसेच, अफगाणिस्तानातील नदीचे पाणीही अभिषेकासाठी पाठवण्यात आले आहे.
अयोध्येत विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी काश्मीर, तामिळनाडू आणि अफगाणिस्तान येथून आलेले हे गिफ्ट्स यजमान डॉ. अनिल मिश्रा यांना भेट केले आहे. आलोक कुमार म्हणाले, ''कश्मीरमधून काही मुस्लीम बंधू आणि भगिणी आले होत्या. रामलला यांच्या भव्य मंदिराबद्दल त्यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, आमचा धर्म वेगळा आहे, मात्र आपले पूर्वज एक आहेत. राम आमचेही आदरणीय पूर्वज आहेत. यानंतर त्यानी मला दोन किलो काश्मिरी केसर श्री राम लला यांच्या सेवेसाठी भेट स्वरुपात दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य यजमान डॉ. अरविंद मिश्रा यांना हे केसर भेट केले जात आहे. याशिवाय, तामिळनाडूतील रेशीम तयार करणाऱ्यांनी श्री राम मंदिर चित्रित करणारी रेशमी चादर पाठवली आहे. तर, अफगाणिस्तानहून कुभा (काबूल) नदीचे पाणी श्री रामचंद्र यांच्या अभिषेकासाठी पाठवण्यात आले आहे."
रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी कोण-कोण आमंत्रित -अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला दुपारी 12:15 ते 12:45 दरम्यान रामललाची ‘प्राण प्रतिष्ठा’ होणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यावेळी उपस्थित असतील. या कार्यक्रमासाठी हजारो पाहुने उपस्थित राहणार आहेत. कारण विविध क्षेत्रातील 7,000 हून अधिक पाहुन्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यात राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, उद्योगपती आदींचा समावेश आहे.