पेलिंग (सिक्कीम) : ‘काश्मीर आमचे आहे. काश्मिरी आमचे आहेत आणि काश्मिरियतही आमचीच आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केले. मोदी सरकार निश्चितपणे काश्मीर समस्येवर कायमचा तोडगा काढेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. काश्मीर खोऱ्यातील सातत्यपूर्ण हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही ग्वाही दिली. येथे जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काश्मीरमध्ये कुरापती काढून पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, आमचे सरकार काश्मीर मुद्यावर निश्चित कायमचा तोडगा काढेल.गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वनी मारला गेल्यापासून काश्मीर धगधगत आहे. मध्यंतरी हिंसाचाराचा थोडा खंड पडला होता. मात्र, श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान पुन्हा तो उफाळला. तेव्हापासून राज्यात सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. गृहमंत्री तीन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी चीन-भारत सीमेलगतची विकास कामे आणि सुरक्षा स्थितीचा एका बैठकीत आढावा घेतला. त्यांनी नथूला सीमा चौकीसह इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि एसएसबीच्या काही चौक्यांना भेटी दिल्या. (वृत्तसंस्था)‘पाकिस्तान बदलेल; न बदलल्यास बदलण्यास भाग पाडू’२०१४ मध्ये मोदी सरकारच्या शपथविधीसाठी सर्व शेजारी देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले होते. भारताला सर्व शेजाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध हवे असल्याचे ते संकेत होते. तथापि, पाकच्या वर्तणुकीत कोणताही बदल झाला नाही ही खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तान बदलेल, अशी आम्हाला आशा आहे. जर तो बदलला नाही तर आम्हाला त्याला बदलण्यास भाग पाडावे लागेल. जागतिकीकरणानंतर एक देश दुसऱ्या देशाला उलथून टाकू शकत नाही. कारण, ही बाब आंतरराष्ट्रीय समुदाय विसरणार नाही.
काश्मीर आमचेच!
By admin | Published: May 22, 2017 3:31 AM