श्रीनगर : प्रजासत्ताकदिनी हल्ले चढविण्याचा जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा कट सुरक्षा दलांनी गुरुवारी उधळून लावला. या प्रकरणी पाच दहशतवाद्यांना अटक झाली असून त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा व स्फोटके जप्त करण्यात आली.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, हजरतबल भागामध्ये यापूर्वी झालेल्या दोन ग्रेनेड हल्ल्यात या दहशतवाद्यांचा हात होता. त्याच भागातून या पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने अटक केली. अय्याझ अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद चिक्ला, साहिल फारूक गोजरी, नसीर अहमद मीर अशी त्यांची नावे आहेत.
हे सर्वजण हजरतबल भागामध्येराहाणारे आहेत. एका स्वतंत्र घटनेत लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांचा साथीदार इश्फाक अहमद दार उर्फ माहिर याला पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातून पोलिसांनी अटक केली. तो डांगरपोरा-पदगमपोरा या भागामध्ये राहातो. या परिसरातील घातपाती कारवायांसाठी लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांना तो मदत करत होता. स्थानिक नागरिकांना तो धमकावत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या.