श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर येथील तरुणांकडून होणारी दगडफेक हा चिंतेचा विषय बनला आहे. तेथील सुरक्षा जवान आणि पोलिसांनी तरुणांच्या या हिंसात्कम कृत्याचा सामना करावा लागतो. मात्र, या दगडफेकीतील आरोपींना पकडण्यासाठी जम्मू-काश्मीरपोलिसांनी चांगलीच शक्कल लढवली. शुक्रवारी पोलिसांनी येथील जामा मशिदीजवळ दगडफेक करणाऱ्या तरुणांमध्ये काही आपली माणसे पाठवली. त्यामुळे गर्दीतील खऱ्याखुऱ्या दगफेकी दंगेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
जामा मशिद येथील नमाज अदा केल्यानंतर तेथील परसरात दगडफेक करणाऱ्या जमावात पोलिसांनी काही आपले विश्वासू साथीदार घुसवले. ठरल्याप्रमाणे तेथील काही समाजकंटकांनी नमाज पठण होताच, पोलीस आणि सीआरपीएफ जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी पोलिसांकडून कुठलिही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी न अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या न लाठीचार्ज केला. पाहता पाहता 100 पेक्षा जास्त तरुण दगडफेक करण्यासाठी एकत्र जमले. या जमावाचे नेतृत्व दोन तरुणांकडून करण्यात येत होते. त्यावेळी गर्दीत घुसलेल्या पोलिसांच्या साथीदारांनी या जमावाचे नेतृत्व करणाऱ्या दोघांना पकडले. तसेच समोरच उभ्या असलेल्या पोलीस वाहनाकडेही नेले. जमावात घुसलेल्या पोलिसांनी यावेळी खेळण्यातील नकली बंदुकीचा वापर करुन या दगडफेक करणाऱ्या भामट्यांना चतुराईने अटक केली. पोलिसांच्या या कारवाईनंतर जमाव शांत झाला आणि दगडफेक करणारे तरुणही पळून गेले.