Kashmir Target Killing: काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित, गैर-काश्मिरी हिंदू आणि देशभक्त मुस्लिमांची निर्घृणपणे हत्या केल्या जात आहेत. 3 दिवसात 3 हिंदू मारले गेले, तर यावर्षी आतापर्यंत 18 टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. एकामागून एक या घटनांनी 90च्या दशकातील आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. या घटनांमुळे खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे पलायन पुन्हा एकदा सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा सलग दुसऱ्या दिवशी उच्चस्तरीय बैठक घेत आहेत.
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर काश्मिरी पंडित जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी दहशतवादविरोधी कारवाई तीव्र केली आहे. याशिवाय, 2019 मध्ये कलम 370 अंतर्गत राज्याला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सामान्य झाल्यामुळे आणि पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरोधात स्थानिकांचा आवाज वर गेल्यामुळे दहशतवादी संतापले आहेत. यामुळेच ते टार्गेट किलिंग करत आहेत. तीन दिवसांत एक काश्मिरी आणि दोन बिगर-काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी कुलगाममधील शाळेबाहेर दहशतवाद्यांनी रजनी बाला नावाच्या सरकारी शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली. गुरुवारी कुलगामच्या अरेह गावात दहशतवाद्यांनी स्थानिक देहाती बँकेचे बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते राजस्थानचे रहिवासी होते. कुमार यांच्या हत्येनंतर काही तासांनी दहशतवाद्यांनी बडगाममध्ये गैर-काश्मीरी मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात दिलखुश कुमार यांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी तहसील परिसरात घुसून लिपिक राहुल भट यांची गोळ्या घालून हत्या केली होती.
टार्गेट किलिंगच्या विरोधात योजना तयार कराविजय कुमार यांच्या हत्येनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीत NSA अजित डोवाल आणि RAW प्रमुख सामंत गोयल यांच्यासोबत बैठक घेतली. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आणि जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी एलजी मनोज सिन्हा यांच्यासोबत शाह यांची बैठक प्रस्तावित होती, परंतु त्याच्या एक दिवस आधी त्यांनी दहशतवादविरोधी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी NSA सोबत बैठक घेतली. टार्गेट किलिंगमध्ये गुंतलेले बहुतेक दहशतवादी असे आहेत ज्यांचा कोणताही पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही किंवा त्यांनी कोणत्याही दहशतवादी छावणीत प्रशिक्षण घेतलेले नाही. हे 'हायब्रीड' दहशतवादी सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान बनले आहेत. याला सामोरे जाण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिस अशा 'अदृश्य' हायब्रीड दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रित करतील, अशी रणनीती आखण्यात आली आहे.
दहशदवाद्यांचा नवीन पॅटर्न जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवाद्यांनी डावपेच बदलले आहेत. दहशतवादी आता क्षुल्लक गुन्हे किंवा कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या स्थानिक तरुणांना आमिष दाखवून त्यांची भरती करत आहेत. कुख्यात दहशतवादी स्थानिक तरुणांना पैसे किंवा ड्रग्सचे आमिष दाखवत आहेत. त्यांना पिस्तुलांचा पुरवठा केला जात असून हे तरुण 'अर्धवेळ दहशतवादी' किंवा 'हायब्रीड दहशतवादी' म्हणून काम करत आहेत. या दहशतवाद्यांसाठी सामान्य नागरिक हे सोपे शिकार आहेत. हल्ला केल्यानंतर ते पळून जातात आणि हल्ल्यानंतर ते सुरक्षा दलांच्या रडारवरही येत नाहीत. गुरुवारी बँक मॅनेजरच्या हत्येतही अशाच एका हायब्रीड दहशतवाद्याचा हात होता.