Kashmir Violence Target Killing: देशभरात द काश्मीर फाईल्स हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. काश्मीर पंडितांना त्यांच्या घरातून बेघर करण्यात आल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. त्यावेळी काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, तशाच प्रकारची परिस्थितीत हळूहळू निर्माण होते की काय अशी भीती देशवासीयांनी वाटू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांच्या हत्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. जम्मूच्या खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. अनेक भागांमध्ये स्थानिकांना घराबाहेर पडण्यासही बंदी आहे. याच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. मनसेचे प्रवक्ते आणि नेते संदीप देशपांडे यांनीही या मुद्द्यावर मत व्यक्त केले आहे.
काश्मीरच्या खोऱ्यात हिंदूंवर, काश्मिरी पंडितांवर अन्याय-अत्याचार सुरू असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या भागात काहींच्या हत्याही केल्या गेल्या आहेत. भरदिवसा घरात किंवा शाळेत घुसून काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले आहे. "ज्या पद्धतीने काश्मीर मध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसच बंदुका आणि ते चालवण्याचं प्रशिक्षण केंद्र सरकारने दिल पाहिजे", असे मत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
जम्मू आणि काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एसपी वैद्य यांनीदेखील अशा पद्धतीचे मत काही दिवस आधी मांडले होते. "सर्वप्रथम ISI कशाप्रकारे हे हल्ले करत आहेत त्याची माहिती घेणं आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक जनता आणि पोलीस यांच्यात समन्वय असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील हिंदूंसह दुर्बल घटकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले पाहिजे. जेणेकरून त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास ते स्वतःचा बचाव करू शकतील. कारण जो काश्मीरच्या शांततेसाठी लढतो, त्यांना दहशतवादी मारतात. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी ही व्यवस्था करावीच लागेल", असे ते म्हणाले होते.
दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित असणार आहेत.