ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 9 - गेल्या काही काळापासून काश्मीरमध्ये फुटीरतावादाने आणि कट्टरतावादाने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. काश्मीरमधील तरुणांना फुटीरता आणि कट्टरतावादाकडे वळवण्यासाठी मशीद आणि मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे.
गेल्या महिन्यात दक्षिण काश्मीरमधील एका मशिदीत मुफ्ती शब्बीर अहमद कासमी यांनी हिज्बुलचा कमांडर जाकीर मुसा याने केलेल्या इस्लामिक जिहादच्या आवाहनाचे उघडपणे समर्थन केले होते. कुठल्याही धर्मगुरूने धार्मिक स्थळी लोकांना दहशतवाद्याचे समर्थन करण्याचे आवाहन करण्याची घटना पहिल्यांदाच घडली होती. कासमी यांचा हा व्हीडिओ काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सोशल मीडियाचा त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर झाला. काश्मीरमध्ये दहशतवादाचा उदय झाल्यापासून 1989 नंतर मशिदींचा वापर फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यासाठी होऊ लागला होता. मात्र गेल्या काही काळात मशिदींच्या विचारसरणीत लक्षणीय बदल झाला आहे. हनफी, बरेलवी इस्लामसारख्या मवाळ विचारसरणीवर विश्वास ठेवणारे काश्मीरमधील मुसलमान आता कट्टर अलहे हदीसकडे वळू लागले आहेत.
तर सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वहाबी विचारसरणीचा प्रभाव इंटरनेट, सोशल मीडियावरून वाढला आहे. ही बाब याच्याशी निगडित असलेल्या मशिदी आणि साहित्यापेक्षाही धोकादायक आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काश्मीरमध्ये 28 लाख मोबाइल आणि इंटरनेटचा वापर करणारे आहेत. त्यामुळे एखाद्या धर्मप्रचारकाने बुऱ्हाण किंवा मुसाचे गुणगान केले तर त्याचा व्हिडिओ स्मार्टफोनवरून लाखो लोकांपर्यंत पोहोचतो.