श्रीनगर : फुटीरवाद्यांच्या बंदमुळे प्रशासनाने श्रीनगरच्या काही भागांतील जमावबंदीचे आदेश शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी कायम ठेवले. जेकेएलएफचा संस्थापक मकबुल भट्ट याच्या फाशीला २२ वर्षे झाल्यानिमित्त फुटीरवाद्यांनी आज बंदचे आवाहन केले आहे. मैसुमा पोलीस ठाण्यासह शहराच्या अंतर्गत भागातील जमावबंदीचे आदेश सलग तिसऱ्या दिवशी कायम ठेवण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अफजल गुरूच्या फाशीला चार वर्षे झाल्यानिमित्त फुटीरवाद्यांनी गुरुवारी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे गुरुवारी श्रीनगरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली होती. हे आदेश शुक्रवारी उठविण्यात आले असते. तथापि, फुटीरवादी लाल चौक आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्यामुळे शुक्रवारी ते कायम ठेवण्यात आले. शनिवारी पुन्हा बंदचे आवाहन केले गेल्यामुळे प्रशासनाने मैसुमा आणि शहराच्या आतील भागातील निर्बंध कायम ठेवले; मात्र शहराच्या इतर भागांतील निर्बंध उठविण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. कोणत्याही प्रकारची निदर्शने उधळून लावण्यासाठी श्रीनगर शहरातील संवेदनशील भागासह खोऱ्यात इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. भट याच्या फाशीच्या निषेधार्थ हुरियत कॉन्फरन्सचे दोन्ही गट आणि जेकेएलएफने केलेल्या बंदच्या आवाहनामुळे खोऱ्यातील सामान्य जनजीवन आज विस्कळीत झाले. खोऱ्यातील बहुतांश दुकाने, पेट्रोलपंप आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि सार्वजनिक वाहतूक आज बंद होती. तथापि, खासगी कार, कॅब्स आणि आॅटोरिक्षा रस्त्यावर धावत होत्या. भट्ट याला नवी दिल्लीतील तिहार कारागृहात ११ फेब्रुवारी १९८४ रोजी फाशी देऊन तेथेच दफन करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
काश्मीर खोऱ्यात जमावबंदी!
By admin | Published: February 12, 2017 5:35 AM