काश्मीरची स्थिती अत्यंत वाईट - गुलाब नबी आझाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:22 AM2018-02-08T04:22:24+5:302018-02-08T04:22:37+5:30
जम्मू आणि काश्मीरमधील आजची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगून काँग्रेसने बुधवारी पाकिस्तानी एक दहशतवादी श्रीनगरमधील रुग्णालयातून फरार होण्यास राज्यातील भाजप-पीडीपीचे सरकार जबाबदार आहे, असा ठपका ठेवला.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील आजची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगून काँग्रेसने बुधवारी पाकिस्तानी एक दहशतवादी श्रीनगरमधील रुग्णालयातून फरार होण्यास राज्यातील भाजप-पीडीपीचे सरकार जबाबदार आहे, असा ठपका ठेवला.
राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, मंगळवारी एसएमएचएस रुग्णालयातून दहशतवादी नावेद ऊर्फ हुनझुल्लाह याचे फरार होणे हे राज्य आणि देशासाठी काही चांगले नाही. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत वाईट बनली आहे हे मी वारंवार सांगत आलो आहे.
दहशतवादी पोलिसांच्या हातातून फरार होण्याची घटना ही गेल्या २० वर्षांतील पहिली असल्याचे सांगून आझाद म्हणाले की, १९९० मध्ये अशा घटना घडायच्या. यात राज्य सरकारची चूक आहे. सुरक्षेची योग्य ती व्यवस्था न करता अशा दहशतवाद्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याला लष्कराच्या रुग्णालयातही नेता आले असते.
सुरक्षेवर चर्चा हवी
दहशतवादी फरार होण्याची घटना दुर्देवी असल्याचे सांगून आझाद यांनी काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर पूर्ण चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी केली. अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड देताना सरकारने अतिशय सावध राहिले पाहिजे, असे आवाहन करून ते म्हणाले की, अशा घटना पुन्हा घडू नयेत.