श्रीनगर: जग अद्याप कोरोना संकटातून पूर्णपणे सावरलेलं नसताना, चीनसह काही देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट आली असताना आता प्राण्यांमधून माणसांपर्यंत पोहोचणारा आणखी एक विषाणू शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. रिफ्ट व्हॅली फीव्हर (RVF) असं या विषाणूचं नाव आहे. गाय, म्हैस, बकरी, मेंढी यासारख्या पशूंमध्ये रिफ्ट व्हॅली फीव्हर विषाणू पसरतो. या प्राण्यांमधून तो माणसांपर्यंत संक्रमित होतो. हा विषाणू माणसांपर्यंत नेमका कसा पोहोचतो, याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.
रिफ्ट व्हॅली फीव्हरचे बहुतांश रुग्ण आफ्रिकन देशांमध्ये आढळून आले आहेत. मात्र भविष्यात हा विषाणू धोकादायक ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. रिफ्ट व्हॅली फीव्हरमुळे भविष्यात महामारी येऊ शकते, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तवण्यात आली आहे. प्राण्यांमध्ये होणाऱ्या रक्तस्रावामुळे या आजाराची सुरुवात होते. रिफ्ट व्हॅली फीव्हरची लागण झालेल्या अनेकांनी जीव गमावला आहे.
रक्तस्राव होत असलेल्या प्राण्यांना डास चावतात. त्यानंतर हेच डास माणसांना चावल्यावर त्यांच्या शरीरात विषाणूचा शिरकाव होतो. द स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, रिफ्ट व्हॅली फीव्हरमुळे आफ्रिकेत अनेक गर्भवती महिलांनी बाळ गमावलं आहे. त्यांना गर्भपात करावा लागला आहे. याशिवाय वेळेआधीच अनेक महिलांची प्रसूती झाली आहे. बाळ गमावण्याचं प्रमाण ४.५ पटीनं वाढली आहे.
रिफ्ट व्हॅली फीव्हरचा विषाणू कशाप्रकारे पसरतो, संक्रमित होतो, त्याचा शोध जम्मू-काश्मीरमधील विषाणूशास्त्रज्ञ डॉ. सफदर गनई यांनी घेतला आहे. हा विषाणू एक प्रोटिन LRP1 च्या माध्यमातून मानवी कोशिकांपर्यंत पोहोचतो. कमी घनता असलेल्या लिपोप्रोटिनला हटवण्याचं काम हे प्रोटिन करतं. लिपोप्रोटिन बॅड कॉलेस्ट्रॉलला रक्तात नेण्याचं काम करतो. सेल नावाच्या विज्ञान मासिकात याबद्दलचा अहवाल प्रकाशित झाला आहे.