श्रीनगर - स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मीरमधील जनतेची पहिली प्राथमिकता आहे, असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे जम्मू-काश्मीरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोझ यांनी केले आहे. सद्यस्थितीत काश्मीरशी जोडल्या गेलेल्या देशांमुळे काश्मीरला स्वातंत्र मिळणे शक्य नाही. मात्र काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्याची काश्मिरी जनतेची इच्छा नाही, असेही सोझ यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सोझ यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.
सोझ म्हणाले, स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मिरी जनतेची पहिली प्राथमिकता आहे, असे मला वैयक्तिकरीत्या वाटते. काश्मीरला ना भारतासोबत राहायचे आहे ना पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करून घ्यायचे आहे. सद्यस्थितीत काश्मीरमधील जनतेसाठी शांततापूर्ण वातावरण तयार करण्याची गरज आहे, जेणेकरून येथील जनता शांततेने नांदू शकेल." दरम्यान, आपल्या या वक्तव्याशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसून, वैयक्तीक पातळीवर आपण काश्मिरी जनतेच्यावतीने हे वक्तव्य करत असल्याचेही सोझ यांनी पुढे स्पष्ट केले.
सैफुद्दीन सोझ हे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी काश्मीरचा इतिहास आणि वर्तमानाशी संबंधित एक पुस्तकही लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार आहे. या पुस्तकात सोझ यांनी 'सार्वमत घेतल्यास काश्मिरी जनता भारत किंवा पाकिस्तानमध्ये न जाता स्वतंत्र राहणे पसंद करेल,' या पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.