नितीन अग्रवालबाल्टाल : पुढील वर्षी काश्मीर आणि लेह-लडाखमध्येपर्यटन तीन पटीने आणि गुंतवणूक पाचपट वाढेल, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केला. श्रीनगर आणि लडाखला जोडणाऱ्या जोजीला बोगद्याच्या कामाची त्यांनी मंगळवारी पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांत जागतिक दर्जाचे रस्ते आणि बोगद्यांचे नेटवर्क तयार केले जात आहे. हे प्रदेश दावोस आणि स्विर्त्झलंडपेक्षाही सरस असे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येतील. ११,५७५ फूट उंचीवर तयार केला जात असलेल्या जोजीला बोगद्यात एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी आशियातील सर्वांत लांबीचा आणि जगातील सर्वात उंच बोगदा असेल. यामुळे साडेतीन तासांचा प्रवास १५ मिनिटांत पूर्ण होईल. जोजीला बोगद्याचे काम डिसेंबर २०२६ पूर्ण करण्याचे निर्धारित असले तरी डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी अशा आहे, असे गडकरी यांनी सांगितले.