नवी दिल्ली : राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला विशेष दर्जा रद्द करणे व राज्याऐवजी केंद्रशासित प्रदेश करणे या नव्या उपायांमुळे फुटीरवाद व दहशतवादाचा निर्णायकपणे बीमोड करून जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा नंदनवन होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिली. हे दोन्ही निर्णय काश्मीरच्या हितासाठीच घेण्यात आले आहेत व देशाचा मुकुटमणी असलेल्या या प्रदेशाला पुन्हा एकदा शांत, सुरक्षित व समृद्ध होण्यासाठी हरसंभव मदत करणे हे प्रत्येक देशवासीयाचे कर्तव्य आहे, असे सांगून या खडतर काळात काश्मीरला एकजुटीने साथ देण्याचे आवाहन केले.काश्मीरबाबतच्या निर्णयानंतर मोदींनी प्रथमच ‘दूरदर्शन’वरून देशाला उद्देशून भाषण केले. त्यांनी हे निर्णय का घेतले याचे विवेचन केले व नव्या व्यवस्थेने घडी व्यवस्थित बसली की जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन दिले. लडाख मात्र त्याहून वेगळे व केंद्रशासित प्रदेशच राहील, हेदेखील स्पष्ट केले.कामगार, कर्मचारी, विद्यार्थी, महिला, आदिवासी व अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी केलेल्या सर्व कायद्यांचा लाभ होऊन काश्मीर पुन्हा एकदा विकासाची घोडदौड सुरू करेल. याला वेग देण्यासाठी केंद्र सरकार विशेष मदत करेल. स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सेवेतील सर्व रिक्त पदे लगेच भरली जातील, सैन्य आणि पोलीस भरतीसाठी शिबिरे घेतली जातील आणि काश्मीरमध्ये व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी सार्वजनिक तसेच खासगी उद्योगांनाही प्रोत्साहित केले जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. चित्रपट उद्योगानेही या कामी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.मोदी म्हणाले की, अनुच्छेद ३७० व ३५ ए मुळे काश्मीरला लाभ होण्याऐवजी याचा फायदा घेऊन काही स्वार्थी मंडळींनी तेथील जनमानसात वेगळेपणाची भावना जाणीवपूर्वक निर्माण केली होती. याच भावनेचा शस्त्रासारखा वापर करून पाकिस्तानने तेथे दहशतवादाची बीजे पेरली. पण आता हे सर्व इतिहासजमा होऊन तेथे नव्या युगाची सुरुवात होईल. इतर सर्व देशवासीयांच्या साथीने काश्मीर या संधीचे नक्कीच सोने करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही नवी व्यवस्था पचनी पडेपर्यंत काश्मीरमध्ये सध्या काही खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. काही मूठभर लोक सोडले तर तेथील जनता यास धीराने तोंड देत आहे. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, असेही त्यांनी सांगितले.लवकरच निवडणुकामोदींनी जाहीर केले की, पारदर्शी वातावरणात काश्मीर विधानसभेची निवडणूक लवकरच घेतली जाईल. इतकी वर्षे सत्तेची सूत्रे काही मोजक्या घराण्यांच्या हाती राहिल्याने नवे नेतृत्त्व उदयास आले नव्हते. पण आता नव्या काश्मीरचे नवे आणि समर्थ नेतृत्व तेथील नव्या पिढीतून उदयास येईल.
नव्या उपायांनी काश्मीर पुन्हा नंदनवन होईल; पंतप्रधान मोदींची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 3:27 AM