ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 15 - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी वातावरण तयार करण्यासाठी दहशतवादी संघटनांनी एका वर्षात तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. सुरक्षा जवानांवर दगडफेक करण्यासाठी तरुणांना आपलं जाळ्यात ओढलं जात असून त्यांना 500 रुपये दिले जात आहेत. फक्त 500 रुपयांसाठी हे तरुण दगडफेक करत आहेत, याची कबुली स्वत: दगडफेक करणा-या एका तरुणाने दिली आहे.
'मेल टुडे' वृत्तपत्राने यासंबंधी वृत्त दिलं असून अहवाल प्रसिद्ध केला आहे. गुप्तचर खात्याच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार काश्मीर खो-यात दहशतवादाला बढावा देण्यासाठी दहशतवादी संघटनांनी 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय आपल्या एजंटच्या मार्फेत पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये फंड वाटप करत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सध्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या सय्यद सलाहुद्दीन आणि जमात-उल-दावाचा प्रमुख हाफिज सईदचं नियंत्रण आहे.
सय्यद सलाहुद्दीन आणि हाफिज सईदच्या हाती सूत्र
हिज्बुल मुजाहिदीनचा पोस्टर बॉय बुऱ्हाण वाणीच्या मृत्यूनंतर काश्मीर खो-यात अशांती आणि हिंसा पसरवण्याची जबाबदारी सय्यद सलाहुद्दीन आणि हाफिज सईदवर देण्यात आल्याची माहितीही गुप्तचर खात्याच्या सुत्रांकडून मिळालं असल्याचं अहवालात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. बुऱ्हाण वाणीला इंडियन मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय म्हटलं जायचं. सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणांना शस्त्र उचलण्याचं तसंच हिंसेचं आवाहन करत असे. सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत बुऱ्हाण वाणीचा खातमा करण्यात आला असून त्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला आहे.
दहशतवाद पसरवण्यासाठी मिळणा-या पैशांचा वापर शस्र खरेदीसाठी आणि दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवण्यासाठी केला जात आहे. गेल्या काही वर्षात दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणा-या स्थानिक तरुणांची संख्या वाढली आहे. काश्मीरमधील तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्याची जबाबदारी स्थानिकांवर देण्यात आली आहे. काश्मीरमधील 91 नागरिक ही जबाबदारी पार पाडत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बुऱ्हाण वाणीच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी तात्काळ 4 हिजबुल कमांडरची नियुक्ती केली आहे. बुरहान वनीच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हिंसेत आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे.
बुऱ्हानचा मृतदेह पाकच्या ध्वजात
सुरक्षा दलांनी बुऱ्हान वणीचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर दफनविधीसाठी त्राल या त्याच्या मूळ गावी आणण्यात आला. दफनविधीला गर्दी होऊ नये यासाठी हमरस्ते बंद करण्यात आले होते तरी हजारो लोक डोंगरवाटांनी व पायवाटांनी तेथे जमा झाले. १९९० च्या काश्मीर खोऱ्यातील उद्रेकानंतर पोलिसी कारवाईत मारल्या गेलेल्या कोणाही बंडखोराच्या अंत्ययात्रेस जमलेला हा सर्वात मोठा जनसमुदाय होता, असे मानले जात आहे.
विशेष म्हणजे काश्मीरच्या आझादीसाठी वयाच्या १५ व्या वर्षी हिजबूल मुजाहिदीनमध्ये सामील झालेल्या बुऱ्हानचा मृतदेह पाकच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आला होता. त्याशिवाय शेकडो लोक उघडपणे पाकिस्तानचा ध्वज फडकावित होते. ‘तुम कितने बुऱ्हान मारोंगे, हर घरसे बुऱ्हान निकलेगा’, अशा घोषणा देण्यात येत होत्या.