श्रीनगर : पाकिस्तान हा ढोंगी असून त्याने आमच्या मुलांनी हाती शस्त्रे घ्यावीत म्हणून चिथावणी दिली असल्याचा हल्ला जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला. मेहबुबा यांचे वडील मुफ्ती महंमद सर्ईद यांनी कधीही पाकिस्तानवर टीका केली नव्हती हे विशेष. पाकिस्तानने आमच्या मुलांना हाती शस्त्रे घेऊन मरण्याची चिथावणी देऊ नये. पाकिस्तान त्यांच्या देशातील मुले शस्त्रे हाती घेतात तेव्हा त्यांचा छळ करते आणि आमच्या मुलांना मात्र दुसराच धडा शिकवते; हा ढोंगीपणा आहे, असे त्या रविवारी वार्ताहरांशी बोलताना म्हणाल्या. सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीबद्दलही त्यांनी पाकिस्तानला फटकारले. दरम्यान, काश्मीरमध्ये संचारबंदी आणि इतर निर्बंध कायम असून फुटीरवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी मोर्चा काढण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी सोमवारी सुरक्षा वाढविली आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जो हिंसाचार घडला त्यात सर्वात जास्त म्हणजे १५ बळी अनंतनाग जिल्ह्यातील आहेत. काही घटकांनी अनंतनाग जिल्ह्यात मार्च काढण्याचे आवाहन केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी अनंतनाग, बारामुल्ला, कुलगाम, पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यांत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. श्रीनगरच्या हद्दीत येणाऱ्या ११ पोलीस ठाण्यांमध्येही संचारबंदी लावण्यात आली आहे. बांदिपुरा, बडगाम, गंडेबराल आणि कुपवाडा तसेच श्रीनगर शहराच्या उर्वरीत भागात निर्बंध लादण्यात आले. (वृत्तसंस्था)
काश्मिरी मुलांना पाकची चिथावणी
By admin | Published: July 26, 2016 1:37 AM