श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील काझीगुंड येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले आहे. तर अन्य एक जवान जखमी झाला आहे. लष्कराने या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून, ही चकमक अद्याप सुरू आहे. काश्मीरमधील काझीगुंड येथे आज संध्याकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यावेळी लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. तर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका जवानाला वीरमरण आले. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 7 वर्षांच्या इतिहासात 2017मध्ये पहिल्यांदाच दहशतवाद विरोधी मोहिमेत 200 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या या संयुक्त कारवाईत यंदाच्या वर्षांत 200 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून चार दिवसांपूर्वी दिली होती. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या काश्मीरमध्ये कारवाया करत असलेल्या दहशतवाद्यांची हिट लिस्ट लष्कराने तयार केली आहे. त्या हिट लिस्टच्या आधारावर लष्कराकडून ऑपरेशन हंट डाऊन अंतर्गत दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. दहशतवाद्यांसोबतच्या सर्वाधिक चकमकी या दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियाँन आणि अनंतनाग जिल्ह्यात झाल्या आहेत. तर उर्वरित चकमकी या उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा आणि कुपवाडा जिल्ह्यात आणि मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमधील काझीगुंड येथे चकमक, एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 9:11 PM