ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 18 - दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर केलेल्या हल्ल्यात सहा पोलिस शहीद झाल्याने काश्मीरमधील पोलिसांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जम्मू आणि काश्मीर सरकार फुटिरतावाद्यांबाबत मवाळ भूमिका घेत असल्याने पोलिस कर्मचारी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यावर नाराज आहेत. पीडीपी सरकार 2014 साली मिळवलेल्या विजयासाठी जमात ए इस्लामी या संघटनेच्या सदस्यांच्या उपकापरांखाली आहे. त्यासाठीच राज्य सरकारकडून फुटिरतावाद्यांबाबत मवाळ भूमिका घेतली जाते. हेच फुटिरतावादी लोकांना पोलिसांविरोधात भडकवतात, असे एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.
लष्कराच्या मोस्ट वाँटेड यादीत असलेला दहशतवादी जुनैद मट्टू याला ठार करण्यात आल्यानंतर शनिवारी झालेल्या त्याच्या अंत्य यात्रेत शेकडो लोक पाकिस्तानचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. त्यावेळी काही दहशतवाद्यांनी हवेत गोळीबारही केला होता. शुक्रवारी लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत मट्टू हा त्याच्या दोन सहकाऱ्यांसह मारला गेला होता.
तर अनंतनाग जिल्ह्यातील अचबल भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात 6 पोलिसांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी हा हल्ला मट्टू आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.