ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - काश्मीर खो-यात सुरु असलेल्या हिंसक विरोध प्रदर्शनावर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आपले मौन सोडले. काश्मीरमधल्या परिस्थितीवर संयम दाखवल्याबद्दल काँग्रेसचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार मानले. काश्मीरमधली परिस्थिती हाताळताना सर्वांनीच समजूतदारपणा, परिपक्वता दाखवली यासाठी मी काँग्रेसचेही आभार मानतो असे मोदी म्हणाले.
ज्या मुलांनी हातात लॅपटॉप, क्रिकेट बॅट पकडली पाहिजे त्या हातात आज भिरकावण्यासाठी दगड आहेत. प्रत्येक भारतीयाचे काश्मीवर प्रेम आहे. प्रत्येक भारतीयाला जे स्वातंत्र्य आहे तेच स्वातंत्र्य काश्मीरमधल्या प्रत्येक नागरीकाला आहे. देशातील अन्य भागातील मुलांसारखेच आम्हाला काश्मीरमधल्या युवकांचे उत्तम भविष्य हवे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात सभेमध्ये ते बोलत होते.
काश्मीरी जनतेला उत्कर्षासाठी जी मदत हवी आहे ती केंद्र सरकार करेल. आम्हाला जम्मू-काश्मीरचा विकास हवा आहे. तो विकास महबूबी मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली होवो किंवा केंद्र सरकारच्या. विकासाच्या माध्यमातून आम्ही काश्मीरमधल्या सर्व समस्यांवर तोडगा शोधत आहोत असे पंतप्रधानांनी सांगितले.
काश्मीर विषयावर अटलबिहार वाजपेयींची जी भूमिका आहे त्या मार्गावरुन आम्ही चाललो आहोत असे मोदींनी सांगितले. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीर खो-याच उसळलेल्या हिंसाचारात ५५ जण ठार झाले.