ऑनलाइन लोकमत -
चित्तोडगड, दि. १६ - राजस्थानमधील खासगी विद्यापीठातील चार काश्मिरी विद्यार्थ्यांना हॉस्टेल रुममध्ये गोमांस शिजवत असल्याच्या संशयावरुन मारहाण करण्यात आली आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. चित्तोडगडमधील मेवार विद्यापीठातील ही घटना आहे.
या घटनेनंतर काही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये येऊन घोषणाबाजी केल्याची माहिती आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर नियंत्रणात आणल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गोमांस आहे की नाही ? याची माहिती मिळवण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठण्यात आलं आहे.
'आमच्याकडे सर्व देशभरातून, 23 राज्यांतून विद्यार्थी येतात. आमचं विद्यापीठ म्हणजे मिनी इंडियाच आहे. वेगवेगळ्या संस्कृती समजातून मुलं आलेली असल्याने अशी छोटी भांडणं होत असतात', अस विद्यापीठाचे मिडीया संपर्क अधिकारी हरिश गुरनानी यांनी सांगितलं आहे.
उत्तर प्रदेशमधील दादरी येथील बिसाहडा गावातील जमावाने २९ सप्टेंबर रोजी बीफ खाल्ल्याच्या संशयावरून इखलाख व त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इखलाखचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.या घटनेनंतर संपूर्ण देशात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.