सांबा : तुमचे आई-वडील आणि आजी-आजाेबांच्या वाट्याला आलेले संघर्षमय आयुष्य तुम्हाला जगावे लागणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काश्मीर खाेऱ्यातील युवकांना दिले. कलम ३७० हटविल्यानंतर पंतप्रधान माेदींनी प्रथमच जम्मू आणि काश्मीरचा दाैरा केला. पंचायत दिनानिमित्ताने आयाेजित कार्यक्रमात त्यांनी सुमारे २० हजार काेटी रुपयांच्या विविध याेजनांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. त्यात बनिहाल-काजीगुंड भुयारी मार्गाचाही समावेश आहे. यावेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनाेज सिन्हा उपस्थित हाेते.
माेदींनी यावेळी जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात शांतता नांदण्यासाठी तसेच विकासासाठी उचलण्यात आलेल्या विविध उपक्रमांना अधाेरेखित केले. तरुणांना उद्देशून त्यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये विकास गतीशील करण्यासाठी अनेक याेजनांची वेगाने अंमलबजावणी हाेत आहे. यामुळे या भागातील तरुणांना राेजगाराच्या संधी मिळतील. तुमचे आई-वडील आणि आजी-आजाेबा अतिशय संघर्षमय जीवन जगले. मात्र, तुम्हाला असा संघर्ष करावा लागणार नाही, असे मी तुम्हाला आश्वासन देताे.
पल्ली गावाला बहुमान सांबा जिल्ह्यातील पल्ली ग्रामपंचायतीने देशातील प्रथम शून्य कार्बन डायऑक्सायईड उत्सर्जन करणारी पहिली ग्रामपंचायत बनण्याचा बहुमान मिळविला. या ठिकाणी ५०० किलाेवॉट क्षमतेच्या साैरऊर्जा निर्मिती केंद्राचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.
या याेजनांचे केले उद्घाटनबनिहाल-काजीगुंड भुयारी मार्गाचे नरेंद्र माेदींनी उद्घाटन केले. यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये बाराही महिने रस्ते वाहतूक सुरू राहणार आहे. याशिवाय दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचाही माेदींनी शुभारंभ केला. यासाठी सुमारे ७,५०० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चिनाब नदीवर उभारण्यात येणाऱ्या ८५० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचेही माेदींनी भूमिपूजन केले. तसेच परिसरातील नागरिकांना स्वस्त जेनेरिक औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी १०० औषध केंद्रांचेही माेदींनी उद्घाटन केले.
देशभरातील ३२२ पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या खात्यात ४४.७ काेटी रुपयांचे वाटप डिजिटल माध्यमातून केले. पाच लाखांपासून ५० लाख रुपयांपर्यंत पुरस्कारांची रक्कम आहे.