कतरा (जम्मू) : जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये बालिकेवर झालेल्या बलात्काराची दंशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली असतानाच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्याची दखल घेऊन, आपला संताप व्यक्त केला आहे. या घटनेची शरम वाटते, असे ते म्हणाले.स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही भारतात अशा घटना घडत आहेत. या घटना देशासाठी लज्जास्पद असून, आपण कोणत्या प्रकारचा समाज घडवत आहोत, याचा आता आपण विचार करायला हवा, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी आपला संताप व्यक्त केला.देशात कोणत्याही मुलीच्या किंवा महिलेच्या बाबतीत अशी घटना घडणार नाही, ही जबाबदारी आपली सर्वांची, समाजाची आहे. प्रत्येक मुलीचे रक्षण आपणच करायला हवे, असे सांगून राष्ट्रपतींनी कथुआ बलात्कार प्रकरणातही न्याय झालाच पाहिजे, असे स्पष्ट केले. श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभासाठी आलेले रामनाथ कोविंद कथुआ बलात्कार प्रकरणाविषयी बोलणार का, आपली नाराजी व्यक्त करणार का, अशी चर्चा सुरू होती.देशातील मुली देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही मेरी कोम, मनिका बत्रा, संगीता चानू, मीराबाई चानू यासारख्या देशाच्या कन्यांनी सुवर्ण पदके पटकावून देशाचे नाव मोठे केले, याचाही उल्लेख त्यांनी केला. (वृत्तसंस्था)मला बोलण्याचा सल्ला देणाऱ्यानरेंद्र मोदींनीच आता मौन सोडावेकथुआ, उन्नाव बलात्कार प्रकरण आणि चलन तुटवडा या विषयांवर मौन धारण केल्याबद्दल, पंतप्रधान मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हल्ला चढविला आहे. मी नेहमी मौन बाळगतो, अशी टीका मोदी सतत माझ्यावर करीत असत. आता स्वत:च्या सल्ल्याची पंतप्रधान मोदी यांनी अंमलबजावणी करावी, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी दिला आहे.न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारीवैष्णोदेवीच्या भूमीत लहान मुलीवर अत्याचार होतो, त्यावरून समाजात चुकीच्या गोष्टी सुरू असल्याचे स्पष्ट होते, या शब्दांत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दु:ख व्यक्त केले. कथुआ प्रकरणात न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पूर्ण करू, असे वचनही मुफ्ती यांनी दिले.
कथुआची घटना संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद; राष्ट्रपती कोविंद संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 4:03 AM