नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे 8 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले होते. तसेच दीपिका सिंह राजावत या महिला वकिलाने पीडित कुटुंबीयांच्यावतीने खटला लढण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र आता पीडित कुटुंबीयांनी हा महिला वकिलाला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कथुआ बलात्कारातील पीडित कुटुंबीयांचा खटला लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दीपिका सिंह राजावत यांचे नाव देशभरात पोहोचले होते. त्यांनी पीडितांविषयी दाखवलेल्या कळकळीचे कौतुक झाले होते. मात्र आता राजवत यांना या खटल्यात तेवढासा रस नाही, तसेच त्या न्यायालयातही उपस्थित राहत नाहीत, असे कारण देत पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी राजावत यांना खटल्यातून हटवण्याची मागणी न्यायालयात केली. त्यानंतर न्यायालयानेही त्यांच्या अर्जाचा विचार करून दीपिका यांना खटल्यातून हटवले. दीपिका यांच्या आत्ममुग्धतेमुळे पीडितेचे कुटुंबीय दु:खी झाले होते. त्यामुळे त्यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पीडितेच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात भटक्या जमातीमधील आठ वर्षाच्या मुलीला मंदिरात कोंडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. गेल्या १० जानेवारीस या मुलीचे अपहरण केले गेले व एका छोट्या मंदिरात डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केले गेले. चार दिवस गुंगीच्या औषधांनी बेशुद्ध ठेवल्यानंतर दगडाने डोके ठेचून तिचा खून केला गेला. निश्चित केलेल्या आरोपांत कट कारस्थान करणे, खून, बलात्कार व पुरावे नष्ट करण्यासह अन्य गुन्ह्यांचा समावेश आहे.
Kathua Rape Case : पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी 'त्या' महिला वकिलाला हटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 3:31 PM