श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरणात आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान,'एनडीटीव्ही'नं दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी सांजी राम याने सर्वोच्च न्यायालयासमोर स्वतःला निष्पाप असल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही तर मी पीडितेच्या आजोबाप्रमाणे असल्याचंही त्यानं कोर्टासमोर म्हटले. शिवाय, संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, जेणेकरुन खरे दोषी पकडले जातील, असेही सांगितले. मला या प्रकरणात गोवले गेल्याचंही सांजी रामने कोर्टात म्हटले. ज्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, ती माझ्या नातीसारखी होती. तिच्यासोबत मी असे कृत्य कसे करेन?, असेदेखील तो म्हणाला.
दरम्यान, कथुआ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 7 मे रोजी होणार आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला जावा, अशी विनंती आरोपींनी केली आहे, तर पीडितेच्या वडिलांनी हा खटला चंदीगड येथे वर्ग करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. या प्रकरणातील बलात्कारितेचे वडील व अन्य काही जणांनी या याचिका दाखल असून, सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
खटल्याचे स्थानिक न्यायालयात सुरू असलेले कामकाज निष्पक्षपणे होत नसल्याची जरा जरी शंका आली, तरी तो दुसरीकडे वर्ग केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. आपल्या जिवाला धोका असल्याचे बलात्कारितेचे वडील व कुटुंब, त्यांचे वकील यांनी सांगितले होते, तसेच स्थानिक न्यायालयातच कथुआ खटला चालू द्यावा, तो अन्यत्र वर्ग करू नये आणि प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला जावा, अशी याचिका या प्रकरणातील दोन प्रमुख आरोपींनी केली आहे.