जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. हे पाचही जवान उत्तराखंडचे रहिवासी होते. भारतीय लष्करात मेजर म्हणून कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय प्रणय नेगी यांच्या मृत्यूतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात प्रणय यांचे चुलत भाऊ आदर्श नेगी शहीद झाले आहेत.
बलवंत सिंह नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "फक्त दोन महिन्यांपूर्वी आम्ही मुलगा गमावला. देशाची सेवा करताना तो शहीद झाला, तो मेजर होता. आता आम्हाला कळलं आहे की जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ताफ्यावर हल्ला केला. पौरी- येथील लष्कराचे पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यात आमच्या भागातील पाच जण शहीद झाले आहेत. त्यामध्ये आदर्श नेगीही आहे. बळवंत नेगी यांचा मुलगा मेजर प्रणय नेगी हे लेहमध्ये कार्यरत होते आणि ३० एप्रिल रोजी शहीद झाले.
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात सोमवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या पाच लष्करी जवानांमध्ये आदर्श नेगी यांचाही समावेश आहे. कठुआपासून सुमारे १५० किमी अंतरावर असलेल्या माचेडी-किंडली-मल्हार रस्त्यावर नियमित गस्तीवर असलेल्या लष्कराच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि त्यानंतर गोळीबार केला. आदर्श २०१८ मध्ये गढवाल रायफल्समध्ये सामील झाले आणि त्यांचे वडील शेतकरी आहेत. त्यांना आई, भाऊ आणि मोठी बहीण आहे. त्यांचा भाऊ चेन्नईत काम करतो तर त्यांच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आहे.
आदर्श यांचे काका म्हणाले की, तो एक अतिशय हुशार मुलगा होता. त्याने बीएससीचे शिक्षण घेतले. तो नेहमीच तंदुरुस्त होता आणि मी त्याला नेहमीच प्रोत्साहित केलं. त्याला सैन्यात नोकरी मिळाली आणि आता त्याने देशासाठी बलिदान दिलं आहे. दोन महिन्यांत आम्ही आमचे दोन पुत्र गमावले आहेत. मी सरकारला काही कठोर पावलं उचलण्याची विनंती करेन. रोजगाराची कमतरता आहे आणि गढवाल आणि कुमाऊंमधून देशसेवेसाठी गेलेली मुलं अनेकदा शहीद होतात."
आदर्श नेगी यांनी रविवारी वडिलांशी फोनवर चर्चा केली होती. दुसऱ्या दिवशी दलबीर सिंह नेगी यांचा पुन्हा फोन आला, पण यावेळी त्यांचा मुलगा लाइनवर नव्हता, जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मुलगा शहीद झाल्याची माहिती समोर आली. या फोन कॉलने कुटुंबाला धक्का बसला. आदर्श नेगी हे तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होते.