नवी दिल्ली- कथुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. तरीही मोदींचे मंत्री वादग्रस्त विधानं करण्यापासून स्वतःला थांबवू शकलेले नाहीत. मोदींच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री असलेले संतोष गंगवार यांनीही एक वादग्रस्त विधान केलं आहे. कथुआ- उन्नाव प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, भारतासारख्या मोठ्या देशात बलात्कारासारख्या एक-दोन घटना होत असतात, त्यात कोणतीही मोठी गोष्ट नाही.उत्तर प्रदेशातल्या बरेली येथे केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. ते म्हणाले, बलात्कारासारख्या घटना कधी कधी थांबवता येत नाहीत. तरीही सरकार प्रत्येक ठिकाणी सक्रिय असून, चांगलं काम करते आहे. संतोष गंगवार यांच्या या विधानमुळे मोदींच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असून, विरोधकही मोदींना घेरू शकतात. काय आहे कठुआ प्रकरणजम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथे आठ वर्षे वयाच्या मुलीचं 10 जानेवारीला अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अत्याचारानंतर त्या मुलीची हत्या केली. 17 जानेवारीला जंगलात त्या मुलीचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली. आरोपींमध्ये राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्सटेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांच्याविरुद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारवर अनेक कलम लावण्यात आली आहेत.