नवी दिल्ली - बिहारमध्ये जन्माला आलेल्या एका बाळाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. कटिहार जिल्ह्यामध्ये एक अजब घटना समोर आली आहे. चार पाय आणि चार हात असलेल्या एका बाळाचा जन्म झाला आहे. या घटनेने सर्वच हैराण झाले असून बाळाला पाहण्यासाठी तुफान गर्दी होत आहे. अनेकांनी हा दैवी चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. तर काही जण मुलाच्या पाया पडण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. चार हात-पाय असलेलं बाळ पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. सर्वत्र फक्त या बाळाचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुराधा कुमारी नावाची महिला कटिहारमधील रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तिने एका अनोख्या बाळाला जन्म दिला आहे. ज्याचं एक डोकं, एक धड आहे. पण त्याला चार-चार हात-पाय आहेत. लोक याला दैवी चमत्कार म्हणत आहेत, बाळाला देवाचा अवतार मानत आहेत. त्याला पाहण्यासाठी लोक रुग्णालयात येत आहेत. याच दरम्यान बाळाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे ही, एका खासगी क्लिनिकमध्ये तीन ते चार वेळा अल्ट्रासाऊंड केलं होतं. त्याचा बाळावर परिणाम झाला असावा. बाळ स्वस्थ आणि निरोगी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
बाळ एकदम ठणठणीत
डॉक्टरांनी हे बाळ एकदम ठणठणीत असल्याची माहिती दिली आहे. सदर रुग्णालयाची डॉक्टर शशी किरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बाळ म्हणजे अद्भुत, विचित्र किंवा कोणताही दैवी चमत्कार नाही. मेडिकल सायन्समध्ये याआधाही असं घडलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही महिन्यांपूर्वी वैकुंठपूर येथील रेवतिथमध्ये राहणारे मोहम्मद रहीम अली यांच्या 30 वर्षीय पत्नी रबीना खातून यांनी तीन हात आणि तीन पाय असलेल्या बाळाला जन्म दिला होता. डॉक्टर आफताब आलम यांनी सिंड्रोममुळे एबनॉर्मल बाळाचा जन्म झाला आहे. एक लाखांमध्ये अशी एखादीच केस असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं.