नवी दिल्ली/ पाटणा : पाच राज्यांत होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरू होताच एकमकांवर टीका आणि आरोप-प्रत्यारोप करताकरता नेत्यांची जीभही आता घसरू लागली आहे. भाजपचे खासदार विनय कटियार यांची जीभ काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी यांच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना घसरली, तर जनता दल (यू)चे चे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी महिलेच्या सन्मानापेक्षा मताची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे, असे विधान करून स्त्री वर्गाचाच अपमान केला.या वक्तव्यांमुुळे या दोन्ही नेत्यांवर सर्वस्तरांतून टीका सुरू झाली आहे. काँग्रेसने कटियार यांच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी क्षमा मागावी अशी मागणी केली. त्यांच्या वक्तव्यातून महिलांना उपभोगाची वस्तू समजणारी भाजपची क्षुद्र आणि मानहानी करणारी संस्कृतीच प्रतीत होते, असा आरोप काँग्रेसने केला. प्रियंका गांधी यांनीही जोरदार हल्ला करीत कटियार यांच्या वक्तव्यातून भाजपची महिलांकडे बघण्याची मानसिकताच समोर आली आहे, असे म्हटले. त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीही कटियार यांनी अश्लाघ्य वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. कटियार यांच्या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळताच भाजपने मात्र कातडी वाचवण्याचा पवित्रा घेत हात झटकले आहे. केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू म्हणाले की, कटियार यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. त्यांनी असे बोलायलाच नको होते. विशेषत: महिलांविषयी असली टिप्पणी करायलाच नको होती. भाजप अशा वक्तव्याचे समर्थन करीत नाही. स्वत: कटियार यांनी मात्र चौफेर हल्ला होताच सारवासारव सुरू केली. महिलांबद्दल मला आदर आहे. मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कटियार, यादव यांची जीभ घसरली
By admin | Published: January 26, 2017 1:39 AM