ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. केरळमधील सौम्या हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले. काटजू यांनी सौम्या बलात्कार प्रकरणातील दोषी गोविंदसामीला हत्येच्या आरोपातून मुक्त केल्याच्या निर्णयावर टीका केली होती. न्यायालयाचा निर्णय कसा चुकीचा आहे, याचे काटजू यांनी कोर्टात येऊन स्पष्टीकरण द्यावे असं कोर्टाने सांगितलं.
काटजू यांनी फेसबूक पोस्टमध्ये सौम्या बलात्कार प्रकरणातील दोषीला आरोपमुक्त करण्याबाबत टीका केली होती. त्यामुळे काटजू यांना 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर हजर राहावं लागणार आहे.