ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू पुन्हा एकदा बरळले आहेत. 'पाकिस्तानला एका अटीवर काश्मीर देण्यास आम्ही तयार आहोत, त्यांना काश्मीरसोबत बिहारही घ्यावा लागेल,' अशी फेसबूक पोस्ट मार्कंडेय काटजू यांनी केली आहे.
काटजू यांच्या या वादग्रस्त पोस्टमुळे ते पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले आहेत. अनेकांनी काटजू यांचं वक्तव्य बिहारचा अपमान करणारं असल्याचं म्हटलं आहे. मात्र यानंतरही काटजू यांनी फेसबूकवरुन बिहारबद्दल लिहिणं सुरुच ठेवलं. नंतर काटजू यांनी स्पष्टीकरण देत आपण फक्त विनोद करत होतो असं सांगितलं आहे.
'पाकिस्तानवाल्यांनो एकदाच काय तो वाद संपवून टाकूया. आम्ही तुम्हाला काश्मीर द्यायला तयार आहोत, मात्र फक्त एकाच अटीवर, तुम्हाला बिहारदेखील घ्यावा लागेल. हे पॅकेज डील आहे. तुम्हाला सर्व पॅकेज घ्यावं लागेल नाहीतर काहीच मिळणार नाही. काश्मीर आणि बिहार एकत्र घ्या नाहीतर काहीच नाही. फक्त काश्मीर आम्ही तुम्हाला देणार नाही,' असं काटजू यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. काटजू यांच्या पोस्टमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 'अटलबिहारी वाजपेयी यांनी आग्रा भेटीत मुशर्रफ यांना अशीच एक डील ऑफर केली होती. पण मुर्खासारखी त्यांनी नाकारली. तुम्हाला पुन्हा ऑफर मिळत आहे. यावेळी चुकू नका,' असंही काटजू यांनी लिहिलं आहे.