ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. ३० - निवडणुकीत जर मला कौल दिलात तर राज्याचे नेतृत्व करेन असं सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचे आणि सत्ता मिळाली नाही तर आमदार होऊन विरोधी बाकांवर बसणार नसल्याचेही सूचित केले आहे. विदर्भात मंगळवारी प्रचाराला सुरूवात करताना अमरावती येथील सभेत ते बोलत होते.
यापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निव़डणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर नागपूर येथे बोलताना निवडणूक लढवणे आमच्या रक्तात नाही, कारण आम्ही एका मतदारसंघापुरता विचार करू शकत नाही, संपूर्ण महाराष्ट्र हाच आमचा मतदारसंघ आहे, असे सांगत त्यांनी निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते. मंगळवारी अमरावती येथील सभेत बोलताना त्यांनी याचाच पुनरुच्चार करत जनतेने कौल दिल्यास नेतृत्व करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. जर सत्ता दिलीत तर नेतृत्व करत तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.
या सभेत त्यांनी अन्य राजकारण्यांवर सडकून टीका केली. महाराष्ट्रातील मंत्री इस्राइलमध्ये जाऊन तिथल्या शेतीची पाहणी करतात, पण त्यांनीच या राज्याचं ओसाड वाळवंट करून टाकलयं असा टोला त्यांनी हाणला. महाराष्ट्राला देशातील एक नंबरचे राज्य करण्याचे आश्वासन देणारे राजकारणी महाराष्ट्र अनेक बाबतीत पुढे असल्याची शेखी मिरवतात, मात्र राज्य कोणत्या बाबतीत पुढे आहे हेही त्यांनी सांगावे असे आवाहन ठाकरे यांनी केले. खून, दरोडे, बलात्कार, बेरोजगारी या सर्व गुन्ह्यांत महाराष्ट्र पुढे असल्याचे सांगत राजकीय पक्ष जनतेला मुर्ख बनवत असल्याची टीका त्यांनी केली.
खासगी सुरक्षा एजन्सीज संपूर्णपणे बंद करून सुरक्षा व्यवस्थेचे सरकारीकरण करण्याची घोषणाही राज यांनी केली आहे.