मुंबई - कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात बिग बी अमिताभ बच्चन हे समोर हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांना नेहमीच बोलतं करत असतात. स्पर्धकांच्या आयुष्यातील घटना, आवडी-निवडी यासंह त्यांच्या कलागुणांनाही ते वाव देतात. नॅशनल टेलिव्हीजनवरुन देशातील जनतेसमोर स्वत:ला प्रेझेंट करायची संधीच यानिमित्ताने स्पर्धकाला मिळते. त्यामुळेच, केबीसीच्या हॉटसीटवरील काही कंटेन्संट सेलिब्रेटीच बनून जातात. केसीबी 13 च्या किड्स एपिसोडमध्ये हॉटसीटवर बसलेला अरुणोदय शर्मा हाही आता सेलिब्रिटीच बनला आहे.
हिमाचल प्रदेशच्या अरुणोदयने केबीसीच्या सेटवर धमाल केली. त्याच्या संवादाने अमिताभ बच्चन यांचीही बोलती बंद केली होती. संवादातील हजरजबाबीपणा, बुद्धिमत्ता आणि मिश्कीलता याचा त्रिवेणी संगम अरुणोदयच्या खेळात जाणवला. इयत्ता 4 थी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 9 वर्षांच्या अरुणोदयचा चाणाक्षपणा आणि समजूतदारपणा हा 90 वर्षीय वृद्धांसारखा असल्याचे अमिताभ यांनी म्हटलं होतं. अरुणोदयचा एपिसोड सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळेच, हा चिमुकला स्टार बनलाय. त्यामुळेच, अरुणोदयने कुटुंबासमेवत हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी, ठाकूर यांनी त्याचे अभिनंदन करत त्याला मिठाई खाऊ घातली.
मुख्यमंत्र्यांनी अरुणोदयला अनेक प्रश्न विचारले, केसीबी सेटवर काय धमाल केली, अमिताभ बच्चन काय म्हणाले आणि किती रुपये जिंकले, हे प्रश्न ठाकूर यांनी विचारले होते. त्यावर, अमिताभ बच्चन यांची भेट म्हणजे स्वप्नच पूर्ण झाल्याचं वाटलं. तेथे हिमाचल प्रदेशच्या गप्पा-गोष्टी केल्या. तसेच, पहाडी नाटी नृत्यही केल्याचे अरुणोदयने सांगितले. तर, मी 12 लाख 50 रुपयांवर गेम क्वीट केल्याचंही तो म्हणाला. त्यानंतर, आता मिळालेल्या पैशाचं काय करणार असा प्रश्न सीएम ठाकूर यांनी अरुणोदयला विचारला होता. त्यावरही, अरुणोदयने मिश्कील उत्तर दिलं. अजून वेळ आहे, वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत नक्कीच ठरवेल, त्या पैशाचं काय करायचं, असे उत्तर त्याने दिले. अरुणोदयच्या या उत्तरावर मुख्यमंत्र्यांसह सगळेच हसू लागले. दरम्यान, 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अरुणोदयला ते रुपये मिळणार असल्याचं त्याचे वडिल जगदीश शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.