चेन्नई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्याशी १३ मे रोजी भेट होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. द्रमुकने काँग्रेससह तामिळनाडूत आघाडी केली असल्याने स्टॅलिन यांना केसीआर यांची भेट घेण्याची इच्छा दिसत नाही, असे समजते.तेलंगाणा मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले होते की केसीआर हे स्टॅलिन व कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांना प्रादेशिक पक्षांच्या आघाडीसंदर्भात भेटणार आहेत. पण स्टॅलिन १९ मे रोजी होणाऱ्या चार विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत व्यग्र असतील, असे द्रमुकच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांची वे केसीआर यांची भेट होण्याची शक्यता कमी आहे.केसीआर यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केसीआर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. पण कुमारस्वामी यांचा पक्षही कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. तिथे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पेक्षा काँग्रेसचे आमदार अधिक आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसशी त्या पक्षाने आघाडी केली. या पार्श्वभूमीवर कुमारस्वामीही प्रादेशिक पक्षांच्या आघाडीला तयार होण्याची शक्यता कमीच आहे. त्यांचे वडील व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी तर पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना उघडच पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे बिगरकाँग्रेस आघाडीला तो पक्ष तयार होणे शक्य नाही. (वृत्तसंस्था)माकपलाही प्रादेशिक पक्षांची आघाडी नकोच?केसीआर यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनीही प्रादेशिक आघाडीबाबत फारसा उत्साह दाखवला नव्हता. आघाडी करायची की काँग्रेससोबत जायचे, हा निर्णय त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षच घेणार आहे. तो पक्ष प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करण्यास अनुकूल नसल्याचे समजते.
केसीआर व स्टॅलिन यांची भेट अवघडच; प्रादेशिक पक्षांच्या आघाडीत अडथळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 5:48 AM