हैदराबाद : तेलंगणाचेमुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.
के. चंद्रशेखर राव यांनी आपले जन्मगाव चिंतामडाका येथे सोमवारी एका आयोजित कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, 'प्रत्येक परिवाराला सरकारकडून 10-10 लाख रुपये देण्यात येतील. या पैशांचा वापर आपण काहीही खरेदी करण्यासाठी करु शकता.'
याचबरोबर, माझा या गावात जन्म झाला आहे. त्यामुळे सरकारच्या योजनेतून गावातील सर्व 2000 कुटुंबियांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच, गावातील कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या या योजनेच्या निधीला लवकरात लवकर मंजुरी देण्यात येईल, असेही के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांच्या या घोषणेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत जवळपास 2 हजार कोटी रुपयांचा भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांनी के. चंद्रशेखर राव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपा नेते पी. मुरलीधर राव यांनी सांगितले की, फक्त एका गावाला नाही, तर संपूर्ण राज्यातील लोकांना लाभ मिळाला पाहिजे.