‘त्या’ निर्णयाचे जनतेने साेसले हाल, हैदराबादच्या विलीनीकरणावरून केसीआर यांची काॅंग्रेसवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:00 AM2023-11-27T10:00:39+5:302023-11-27T10:08:43+5:30
Telangana Assembly Election: राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास विविध सामाजिक याेजनांमध्ये दिले जाणारे अर्थसाहाय्य वाढविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिले.
खानापूर : राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास विविध सामाजिक याेजनांमध्ये दिले जाणारे अर्थसाहाय्य वाढविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिले. जनतेच्या भावनांचा विचार न करता काॅंग्रेसने हैदराबाद संस्थान आंध्र प्रदेशात विलीन केले. त्यामुळे लाेकांना ५८ वर्षे त्रास सहन करावा लागला, असा आराेप केसीआर यांनी केला.
खानापूर येथील प्रचारसभेत केसीआर म्हणाले, लाेकांनी काॅंग्रेसच्या काळातील ५० वर्षांमधील आणि बीआरएसच्या १० वर्षांच्या सत्तेतील कल्याणकारी याेजनांची तुलना करावी.
‘रायथू बंधू’वरून पलटवार
काॅंग्रेसचे नेते ‘रायथू बंधू’ याेजनेवर टीका करत आहेत. जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी आहे असे म्हणतात. ही खराेखर उधळपट्टी आहे का, असा सवाल केसीआर यांनी केला. ही याेजना बंगालच्या उपसागरात बुडवून टाकू असे काॅंग्रेसचे नेते म्हणतात. त्यांचे सरकार आले तर दलालांचेच फावेल, असेही केसीआर म्हणाले.
प्रचार जाेरात अन् कार्यकर्ते उत्साहात
तेलंगणामध्ये प्रचार अंतिम टप्प्यात आला असून दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांनी निवडणुकीचा ज्वर वाढविला आहे. एका प्रचारसभेत उत्साही कार्यकत्यांनी बांबुंनी बनविलेल्या टाॅवरवर चढून फाेटाे काढले.