हैदराबाद - देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपाने दक्षिण भारतातील तेलंगणावरही यंदा फोकस केलं आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर, एमआयएमनेही ९ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मात्र, केसीआर हेच तिसऱ्यांदा तेलंगणाचे मुख्यमंत्री होतील, असे भाकीत असदुद्दीन ओवैसींनी केले आहे. तसेच, एमआयएमच्या उमेदवारांचं काय होणार, हेही त्यांनी सांगितलं.
तेलंगणात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपानेही शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास राज्यातील महिलांना दरमहा ४,००० रुपयांचा लाभ मिळू शकेल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले. तसेच, सामाजिक पेन्शन, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात आणि मोफत बस प्रवास यांसारख्या सुविधांमध्ये हा लाभ महिलांना मिळेल, अशीही घोषणा राहुल गांधींनी केली.
तेलंगणात केसीआर म्हणजेच चंद्रशेखर राव हेच मुख्यमंत्री होतील, असे AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तिसऱ्यांदा भाकीत केलं आहे. तेलंगणात जनतेच्या आशिर्वादाने एमआयएमचे ९ उमेदवार विजयी होणार आहेत. मला विश्वास आहे की, तेलंगणातील जनता केसीआर यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करेल. पंतप्रधान मोदी फक्त एकच म्हणतील की, स्टेअरींग ओवैसींच्या हातात आहे. तर, राहुल गांधी म्हणतील की, ओवैसी ही भाजपाची बी टीम आहे. हे दोन्ही नेत्यांचे पेटंट डायलॉग आहेत आणि २८ नोव्हेंबरपर्यंत ते फक्त एवढेच सांगतील, असे म्हणत काँग्रेस आणि भाजपावरही ओवैसींनी निशाणा साधला.
वायएसआर तेलंगणाचा काँग्रेसला पाठिंबा
अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या शर्मिला यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीची 'भ्रष्ट आणि लोकविरोधी राजवट' संपवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. शर्मिला म्हणाल्या की, राज्यात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता असताना सरकारविरोधी मतांचे विभाजन करून अडसर बनायचे नाही. तसेच, काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या निर्णयाबद्दल शर्मिला यांनी तेलंगणातील जनतेला माफ करण्याचे आवाहन केले आहे.