हैदराबाद तेलंगणाचेभाजपा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बंदी संजय यांना पोलिसांनी मध्यरात्री अचानक ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तिथे राजकीय वातावरण तणावाचे बनले असून पोलीस ठाण्यासमोर भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. बंदी संजय यांना अटक करण्यात आली असून भाजपाच्या दोन आमदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर तेलंगाणासह भाजपचे राष्ट्रीय नेतेही आक्रमक झाले आहेत. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमिल मालवीय यांनी ट्विट करुन केसीआर सरकारला इशाराच दिला आहे. मात्र, खासदार बंदी यांना नेमकं का अटक केली, याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.
तेलंगणा पोलिसांनी बुधवारी भाजप आमदार रघुनंदन राव आणि एटाळा राजेंद्र आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यासमोर भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलिस आणि भाजप नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना मध्यरात्रीच पोलिसांनी अटक केल्याने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचे हैदराबादमधील प्रमुख नेते रामचंदर राव यांच्याशी चर्चा केली. याबाबत, आता तेलंगणा पोलिसांनी अटकेची माहिती दिली. तसेच, प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचीही माहिती देण्यात आली आहे.
दाखल गुन्हा
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, संजय कुमार यांच्यावर आयपीसीच्या ४२०, १२० बी, मालप्रॅक्टीस कलम ५ आणि सीआरपीसी कलम १५४ व १५७ अनुसार खटला दाखल केला आहे. हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
या कारणामुळे अटक
संजय कुमार हे १० च्या पेपर लीकप्रकरणात सहभागी होते, असे वारंगळचे पोलीस आयुक्त रंगनाथ यांनी सांगितलंय. १० च्या परीक्षेचा पेपर लीक प्रकरण समोर आल्यानंतर बंदी संजय कुमार यांनी विद्यार्थ्यांना सरकारविरुद्ध भडकावलं, तसेच, आंदोलन करण्यास प्रवृत्त केलं. त्यासोबतच, भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आंदोलन करुन सरकारविरुद्ध भडकावलं, त्यामुळे शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप संजय कुमार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पुढील परीक्षा पूर्ण होण्यास व्यत्यय आणण्याचा प्रयत्न बंदी संजय कुमार यांच्या माध्यमातून झाल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
भाजप आक्रमक, मोदींची भेट
दरम्यान, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी देखील तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार यांना फोन करून चर्चा केली आहे. यानंतर संसद परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नड्डा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. तेलंगणा भाजपचे अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय यांना यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील बोम्माला रामाराम पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस बंगारू श्रुती यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बंदी संजय यांच्या ताब्यात घेण्याबाबत उच्च न्यायालयात कैद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याची लेखी आदेश देणारी याचिका दाखल केली आहे.