हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी गुरुवारी गजवेल व कामारेड्डी या दोन विधानसभा मतदारसंघांतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी केसीआर यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर बीआरएसच्या राजवटीत तेलंगणाचा काहीही विकास झाला नाही, अशी टीका काँग्रेस व भाजप करत आहेत. केसीआर यांनी गुरुवारी गजवेल व कामारेड्डी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. कामारेड्डी येथे केसीआर यांच्या विरोधात तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर गजवेल विधानसभा मतदारसंघात केसीआर यांच्या विरोधात भाजपचे आमदार एटाळा राजेंद्र निवडणूक लढवत आहेत.बीआरएसचे कार्याध्यक्ष व केसीआर यांचे पुत्र के. टी. रामाराव हे सिरिसिल्ला येथून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. केसीआर यांचे पुतणे व राज्याचे अर्थमंत्री टी. हरिश राव हे सिद्धीपेट येथून लढत देत आहेत. काँग्रेस व अन्य पक्षांच्या काही उमेदवारांनीही गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
के.टी. रामाराव सुदैवाने बचावलेसत्ताधारी बीआरएस पक्षाचे कार्याध्यक्ष व मंत्री के.टी. रामाराव हे एका खुल्या वाहनातून रोड शोमध्ये सहभागी झाले होते. वाहन पुढे चाललेले असताना त्यातून ते खाली पडतील, असा बाका प्रसंग उद्भवणार होता; पण चालकाने वेळीच ब्रेक लावल्याने त्यांना सावरता येणे शक्य झाले. ही घटना गुरुवारी आरमूर शहरात घडली. के.टी. रामाराव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांचे पुत्र आहेत.