तेलंगणा - विधानसभा बरखास्त केल्यानंतरही तेलंगणात माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याच टीआरएसचा बोलबाला दिसत आहे. स्वतंत्र तेलंगणाच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत 119 पैकी 66 जागांवर विजय मिळवत टीआरएस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला होता. काँग्रेसला 13 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपाला केवळ 5 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यंदा केसीआर यांना रोखण्यासाठी काँग्रेस अन् भाजापाकडून दिल्लीतील दिग्गजांची फौज तेलंगणात उतरणार आहे.
केसीआर यांच्या टीआरएस पक्षाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसकडून सोनिया गांधी, राहुल गांधी यांसह इतर दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. तर भाजपाकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक स्टार प्रचारक रणांगणात दिसतील. मात्र, टीआरएसच्या प्रचाराची धुरा माजी मुख्यमंत्री आणि टीआरएसचे सुप्रिमो चंद्रशेखर राव यांच्यावरच असणार आहे. त्यामुळेच, एका आठवड्यात 66 मतदारसंघात 28 सभा राव घेणार आहेत. तर 5 डिसेंबरपर्यंत 100 मतदारसंघात सभा घेण्याचे राव यांचे उद्दिष्ट आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी 23 नोव्हेंबरला तेलंगणात प्रचार सभा घेतील. मेदचल मतदारसंघात सोनिया यांची सभा होणार आहे. तर 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी राहुल गांधींची सभा होणार आहे. काँग्रेसच्या या दिग्गज नेत्यांच्या सभेमुळे तेलंगणात काँग्रेसचा प्रभाव वाढेल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतिम टप्प्यात म्हणजेच 4 किंवा 5 डिसेंबर रोजी तेलंगणात सभा घेणार आहेत. तर स्टार प्रचारक म्हणून भाजपाध्यक्ष अमित शहा 25, 27 आणि 28 रोजी रॅली काढून सभेला संबोधित करणार आहेत. यांसह भाजपचे आणखी दिग्गज नेते तेलंगाच्या प्रचारार्थ दाखल होणार आहेत.
तेलंगणात काँग्रेसने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू, प्रा.कोडनदरम यांची तेलंगणा जन समिती व सीपीआय यांच्यासोबत आघाडी करत केसीआरविरुद्ध रणशिंग फुकले आहे. काँग्रेस 93 जागा लढणार असून, घटक पक्षांसाठी 25 जागा सोडण्यात येणार आहेत. त्यात 14 जागा तेलगू देसम, 8 जागा टीजेएस व 3 जागा सीपीआयला मिळाल्या आहेत. तर भाजप 119 जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे.