हैदराबाद : तेलंगणाचेमुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे पुत्र व राज्याचे माहिती - तंत्रज्ञानमंत्री के. तारका रामाराव (केटीआर) यांचा भावी मुख्यमंत्री असा विधानसभेचे उपाध्यक्ष पद्मराव गौड यांनी उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केसीआर आपल्या मुलाला लवकरच मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे, अशी चर्चा या घटनेमुळे सुरू झाली आहे.पद्मराव गौड यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात केटीआर यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री केल्याने तसेच त्यांचे अभिनंदन केल्याने तेलंगणा संघर्ष समिती या पक्षातील अनेकांना सुखद धक्का बसला आहे. मात्र पद्मराव गौड यांच्या उद्गारांवर केटीआर यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे शिताफीने टाळले. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकांत तेलंगणा राष्ट्र समितीचा विजय झाला. सलग दुसऱ्यांदा राज्यात सत्तेवर येताना केसीआर यांनी मुलगा केटीआर यांना तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष बनविले. हैदराबाद महापालिका निवडणुकांत तेलंगणा राष्ट्र समितीला निसटता विजय मिळाला.
केसीआर पुत्र होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 4:29 AM