श्राद्ध पक्ष सुरू झाला आहे. त्यामुळे केदारनाथ धाममध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. भाविकांची गर्दी पाहता मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सभामंडपातूनच लोकांना आता बाबा केदार यांचे दर्शन घेता येणार आहे. तर दुसरीकडे येथील पुजाऱ्यांनी हे निर्बंध परंपरेच्या विरोधात असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. व्हीआयपींना गर्भगृहात प्रवेश दिला जात आहे, मात्र सर्वसामान्य भाविकांवर आता बंदीची कारवाई केली जात आहे, असा आरोप चारधाम महापंचायतीचे उपाध्यक्ष आणि केदारनाथचे तीर्थक्षेत्र पुजारी संतोष त्रिवेदी यांनी केला आहे.
श्राद्ध पक्षात बाबा केदार यांच्या दरबारात पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. यासाठी दूरदूरवरून लोक येथे येतात. बाबांच्या दर्शनासाठी रात्री दोन वाजल्यापासून लोक रांगा लावत आहेत, मात्र गर्दीच्या कारणास्तव त्यांना सभा मंडपापुढे जाऊ दिले जात नाही. तर येथे येणाऱ्या व्हीआयपींना कोणत्याही बंधनाशिवाय गर्भगृहात नेले जात आहे, असे संतोष त्रिवेदी म्हणाले. तसेच, गर्भगृहाचे दर्शन बंद करण्याच्या विरोधात संपूर्ण तीर्थ पुरोहित समाज एकवटला असून त्यांनी आपला आक्षेपही व्यक्त केल्याचे संतोष त्रिवेदी यांनी सांगितले.
दरम्यान, संतोष त्रिवेदी यांच्या म्हणण्यानुसार, या दिवसांत म्हणजेच श्राद्ध पक्षाच्या काळात दररोज 18 ते 20 हजार भाविक बाबा केदारची पूजा करण्यासाठी येत असतात. मात्र दुरूनच दर्शन घेऊन त्यांना परत केले जात आहे. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. संतोष त्रिवेदी म्हणाले की, भाविकांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापासून रोखणे हे परंपरेच्या विरोधात आहे. कितीही मोठी गर्दी असली तरी एखाद्याला आपल्या प्रिय व्यक्तीकडे जाण्यापासून रोखणे चुकीचे आहे.