उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. गरुणचट्टी जवळ हा भीषण अपघात झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. यात यामध्ये गुजरातमध्ये राहणाऱ्या कृती बराड या 30 वर्षीय तरुणीचा समावेश होता. कृती ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. काल तिचा वाढदिवस होता आणि वाढदिवशीच तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृती बराड ही गुजरातमधील भावनगर येथील रहिवासी होती. हेलिकॉप्टर अपघातात कृतीसोबत तिची चुलत बहीण उर्वी बराड (25 वर्षे) आणि मैत्रीण पूर्वा रामानुज (26 वर्षे) यांचाही मृत्यू झाला. कृती भावनगर शहरातील एका शाळेत शिक्षिका होती, तर उर्वीने सरदार पटेल विद्यापीठातून कॉम्प्युटरमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर ती एका आयटी कंपनीत काम करत होती. उर्वीची मैत्रीण पूर्वा कॅनडाला जाण्याच्या तयारीत असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
कृती हिचे वडील कमलेश बराड हे गुजरात वीज कंपनी लिमिटेडमध्ये लाइनमन आहेत. एकुलती एक मुलगी अपघातात गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. "कृती आमची एकुलती एक मुलगी आहे. तिचा मंगळवारी वाढदिवस असल्यामुळे तिला शुभेच्छा देण्यासाठी मी सकाळी 9 वाजता व्हिडिओ कॉल केला होता. व्हिडिओ कॉलवर बोलताना तिने आम्हाला फोनवर केदारनाथ येथील दर्शन घडवलं. तसंच आजूबाजूचं वातावरण तिला आम्हाला दाखवायचं होतं, पण मला वेळ कमी आहे, असे सांगून मी कॉल कट केला" असं म्हटलं आहे.
उर्वी हिच्या कुटुंबातील कमलेश यांनी सांगितलं की, या तिघी केदारनाथ येथे दर्शनासाठी भावनगरहून 15 ऑक्टोबरला बसने निघाल्या, आणि त्याचदिवशी अहमदाबादहून ट्रेनमधून पुढील प्रवासाला गेल्या. सोमवारी त्यांनी केदारनाथला जाण्यासाठी विमानानं प्रवास केला. त्या हेलिकॉप्टरने दर्शनासाठी केदारनाथला गेले होत्या तेव्हाच परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.