Kedarnath, Himachal Pradesh: हिमाचल प्रदेश हे हल्लीच्या तरूणाईचे पर्यटनासाठीचे आवडते ठिकाण मानले जाते. केदारनाथसारख्या तीर्थस्थळीदेखील तरूण मोठ्या प्रमाणावर पर्यटन व दर्शनासाठी जातात. पण सध्या भारतीय हवामान विभागाने हिमाचलमध्ये मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय राज्यातील परिस्थिती पाहता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD ने हिमाचल प्रदेशसाठी पुढील 4-5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे आणि पुढील 48 तासांमध्ये राज्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामानाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. याशिवाय भाविकांना मध्येच थांबवण्यात आले आहे. पर्वतांवर झालेल्या पावसानंतर दिल्ली आणि आसपासच्या परिसरातही हवामानात बदल झाला आहे.
दिल्लीची स्थिती कशी?
शुक्रवारी सकाळी अनेक भागात हलका पाऊस झाला आणि किमान तापमान 25.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी कमी आहे. हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, शहरात दिवसा पावसाची शक्यता आहे, तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास असू शकते. IMD नुसार शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता आर्द्रता 78 टक्के होती. अधिकृत माहितीनुसार, सकाळी 8 वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 70 होता, जो 'समाधानकारक' श्रेणीत मोडतो. संध्याकाळी दिल्लीत अनेक ठिकाणी हलका पाऊस होताना दिसत आहे.
उद्याचे हवामान कसे असेल?
शुक्रवारी झालेल्या हलक्या पावसामुळे दिल्लीचे वातावरण आल्हाददायक झाले आहे. दिल्ली आणि आजूबाजूच्या भागातील हवामान पूर्वी खूप उष्ण होते. पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ५ ऑगस्टलाही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसानंतर तापमानात घट दिसून येते. दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असे विभागाने म्हटले आहे. 5 ऑगस्ट रोजी नोएडातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.