Kedarnath Yatra: उत्तराखंडमध्ये सुरू असलेली केदारनाथ यात्रा प्रशासनाने थांबवली आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने सावधानतेची पावले उचलत तत्काळ प्रभावाने केदारनाथ यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये आणि प्रवासी सुरक्षित राहावेत यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे सांगितलं जात आहे. या संदर्भात माहिती देताना, रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने सांगितले की, कोणतीही अनुचित घटना घडू शकतो या भीतीने यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी, सोनप्रयागमधील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.
रूद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाकडून यात्रेकरूंना आवाहन करण्यात आले आहे की, सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ता बंद आहे. त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. उत्तराखंड पोलिसांच्या सतत संपर्कात राहा. दुसऱ्याच्या सांगण्यावरून इतर मार्गाचा वापर करू नका. पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियोजित मार्गांचाच वापर करा. हवामान खात्याने आधीच अलर्ट जारी केला होता आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यात बऱ्याच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दरडही पडली आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडून २ महिन्यांहून अधिक काळ लोटला असून आतापर्यंत ९ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.
दरम्यान, काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी संध्याकाळी ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. गुहेजवळ आलेल्या जोरदार पुरात अनेक भाविक वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत १५-१६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर सुमारे ४० लोक अद्यापही बेपत्ता असल्याचेच सांगण्यात येत आहे. या परिसरात लावण्यात आलेले तंबूदेखील उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे हाहा:कार माजला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लष्कराकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.