'थोडं शांत रहा, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका'; शशी थरुर यांचा एस. जयशंकर यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 08:02 PM2023-04-03T20:02:45+5:302023-04-03T20:07:10+5:30
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांवर टीका केली होती.
नवी दिल्ली :भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. ते सातत्याने भारत-पाकिस्तान (India-Pakistan), भारत-चीन (India-China) आणि पाश्चात्य देशांवर (Westerns Countries) टीका करतात. त्यांचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. आता याच टीकेवरुन काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी त्यांना थोडं शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.
मीडियाशी संवाद साधताना शशी थरुर म्हणाले की, 'जयशंकर माझे जुने मित्र आहेत. त्यांना एक सल्ला देऊ इच्छितो. त्यांनी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं टाळावं. पाश्चिमात्य देशांकडून येणाऱ्या कमेंट्स त्यांनी सामान्य पद्धतीने घ्याव्यात, प्रत्येक वेळेस त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. यामुळे आपलेच नुकसान होत आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी थोडं शांत राहावं,' असा सल्ला थरुर यांनी दिला.
#WATCH | We need not be so thin-skinned, I think it's very important that as govt we take something in stride. If we react to every comment, we are doing ourselves a disservice. I will strongly urge EAM Jaishankar to cool a little bit: Shashi Tharoor on EAM's “West has a bad… pic.twitter.com/2DtYLWspMO
— ANI (@ANI) April 3, 2023
परराष्ट्र मंत्र्यांची पाश्चिमात्य देशांवर टीका
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी पाश्चिमात्य देशांना टोला लगावला होता. 'पाश्चात्य देशांना इतर देशांवर भाष्य करण्याची वाईट सवय आहे.' असे ते म्हणाले होते. परराष्ट्र मंत्री रविवारी बंगळुरू येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. त्यावेळी राहुल गांधींना टोमणे मारताना त्यांनी त्यांच्या अनुभवातून शिकावे, अन्यथा इतर लोकही त्यांच्यावर भाष्य करू लागतील, असेही ते म्हणाले.
अमेरिका आणि जर्मनीची प्रतिक्रिया
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या अपात्रतेवर जर्मनी आणि अमेरिकेने वक्तव्य केले. आम्ही या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया जर्मनीकडून आली होती. तसेच, अमेरिकेनेही या प्ररणावर भाष्य केले होते. त्यांच्या या कमेंट्सवरच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली.