अलिगढ (उत्तर प्रदेश) : “आपल्या मुली जर मुलांसोबत पळून जाऊ द्यायच्या नसतील तर त्यांना मोबाईल फोन्सपासून दूर ठेवले पाहिजे,” अशी वादग्रस्त सूचना उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्य मीना कुमारी यांनी केली आहे. आईंनी त्यांच्या मुलींवर पाळत ठेवली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. वार्ताहरांनी मीना कुमारी यांना गुन्ह्यांत वाढ होत असल्याबद्दल प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “मुलींना मोबाईल फोन्स दिले जायला नकोत आणि जर दिलेच तर कुटुंबीयांनी त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. मुली फोनवर मुलांशी बोलतात व नंतर त्यांच्यासोबत पळून जातात.” तरुण मुली भरकटणार नाहीत हे बघण्याची मुख्य जबाबदारी समाजाची, कुटुंबातील सदस्यांची त्यातही विशेषत: मातांची आहे, असे त्या म्हणाल्या.
दुर्लक्ष नको...- मीना कुमारी यांनी आईंनी त्यांच्या मुलींची काळजी घेतली पाहिजे; कारण तशा घटना या त्यांच्याच दुर्लक्षामुळे घडतात, असे म्हटले. - याचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की, नुकतीच वेगवेगळ्या जातीचा मुलगा आणि मुलगी पळून गेल्याची तक्रार माझ्याकडे आली होती.- मोबाईल फोन्सच्या गैरवापरातून समाजात अशा वाईट घटना घडतात, यावर त्यांनी भर दिला.