नवी दिल्ली :
दुकानात डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पीओएस मशीनच्या वरच कॅमेरा लावण्यात आल्याचा प्रकार राजधानी दिल्लीतील वसंतकुंज भागात उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी आपल्या डेबिट व क्रेडिट कार्डाच्या पिन नंबरची सुरक्षा करावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे.
गृहमंत्रालयाने या प्रकाराचे छायाचित्रच जारी केले आहे. त्यात पीओएस मशीनच्या अगदी डोक्यावर कॅमेरा लावलेला दिसून येत आहे. ग्राहक पिन क्रमांक टाकताना तो टिपला जाईल, अशा पद्धतीने हा कॅमेरा लावला आहे. यातून पिन क्रमांक चोरीला जाण्याची शक्यता आहे.
गृहमंत्रालयाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘आपले पैसे वाचविण्यासाठी आपल्या पिनची सुरक्षा करा. पीओएस मशीन अथवा एटीएम मशीनमध्ये पिन अथवा ओटीपी टाकण्यापूर्वी आसपास कॅमेरा नाही ना याची खात्री करून घ्या. दिल्लीच्या वसंतकुंज भागातील डीएलएफ मॉलच्या अदिदास स्टोअरमध्ये बिलिंग काउंटरच्या अगदी वर कॅमेरा लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. हेरगिरी करणाऱ्या कॅमेऱ्यांपासून सावध राहा.’